पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीत रनिंग करितांना तरुणाचा झाला मृत्यू....



गडचिरोली सुपरफास्ट 
 न्युज वृत्तसेवा
पुणे : 
पुणे पोलिसांच्या भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणीत धावणाऱ्या तुषार भालके या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शिवाजीनगर कवायत मैदानावर शनिवारी सकाळी घडली. मृत्यूमागचे नेमके कारण समजले नाही. मैदानावर धावताना तो सकाळी आठच्या सुमारास चक्कर येऊन पडला. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे निश्चित कारण समजेल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

तुषार बबन भालके (२७) मूळचा नगर जिल्ह्यातील संगमनेरजवळील कोठे बुद्रुक गावचा आहे. शेतकरी कुटुंबातील तुषार काही महिन्यांपासून पोलिस भरतीची तयारी करत होता. पुणे पोलिसांच्या भरतीसाठी शनिवारी शिवाजीनगर पोलिस मुख्यालयातील कवायत मैदानावर मैदानी चाचणी सुरू होती. यासाठी ८०० ते ८५० उमेदावारांना मैदानी चाचणीसाठी बोलविण्यात आले होते. भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या उमेदवारांना क्रमांक देवून सकाळी आठच्या

सुमारास मैदानी चाचणीला सुरू झाली.

मैदानी चाचणीत धावण्यासाठी १६०० मीटरचे अंतर देण्यात आले होते. तुषारने धावण्यास सुरुवात केली. काही वेळात तो मैदानात चक्कर येऊन पडला. पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली.

तुषारच्या मागे आई-वडील, बहीण असा परिवार आहे. त्याच्या कुटुंबीयांना याबाबतची माहिती कळवण्यात आली आहे. ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यानंतरच मृत्यूमागचे निश्चित कारण समजेल, असे पोलिस उपायुक्त पवार यांनी सांगितले. 

0/Post a Comment/Comments